एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या सामन्यात नाणेफेक होताच रोहित शर्माने एक मोठा टप्पा गाठला आहे. तो दिग्गज महेंद्रसिंग, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले. यानंतर रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत पोहोचली होती, जिथे टीमला इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. आता रोहितने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रवेश करताच एक मोठा टप्पा गाठला आहे. कर्णधार म्हणून हा त्याचा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हा टप्पा गाठणारा तो सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने 99 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी टीम इंडियाने 73 जिंकल्या आहेत, तर भारताला केवळ 23 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय दोन सामने अनिर्णित राहिले आणि एकाचा निकाल लागला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 73.73 इतकी आहे.
या खेळाडूंची बरोबरी केली
महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने 332 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून, त्यापैकी 178 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहे. या यादीत त्यांच्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांच्या नावांचा समावेश आहे. आता रोहित शर्माही या दिग्गज कर्णधारांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.