Swami Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांचे ‘हे’ विचार एकदा नक्की वाचा

WhatsApp Group

आज 12 जानेवारी 2023 स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही आपणास स्वामी विवेकानंद यांच्या विषयी थोडक्यात माहिती तसेच काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. 

१)प्रत्येक व्यक्तीला निर्भय होण्याचा संदेश वेदांत देतो. सामर्थ्य हे पुण्य आहे. दुर्बलता हे पाप आहे. एखाद्या बॉंब गोळ्याप्रमाणे अज्ञान राशीवर आदळणारा उपनिषदांतील शब्द आहे ‘अभी:’  म्हणजे निर्भयता. म्हणजेच अध्यात्मिक सामर्थ्य.  कशाचेही भय बाळगू नका तरच तुमच्या हातून पूर्ण कार्य होऊ शकते.  ज्या क्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्याच क्षणी तुमची शक्ती नष्ट होऊन दुर्गति सुरू होईल. म्हणून “ उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका.”

२) जो धर्म किंवा ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा पोरक्या बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही त्या धर्मावर वा त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही.

३) केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे. चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्ती हो होय.

४)  ज्याचे हृदय गरिबांसाठी द्रवते  त्यालाच मी महात्मा म्हणेंन.  नाहीतर तो दुरात्माच  होय.

५) शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण होय.

६)  एकमेकांवर टीका करण्याची वृत्तीच सर्व तंट्याबखेड्यांच्या मुळाशी असते आणि या वृत्तीमुळेच सर्व संघटना ढासळून पडते.

७)शरीराबाहेर निघून एखाद्या जीर्ण वस्त्राप्रमाणे त्याचा त्याग करणे मला कदाचित चांगले वाटेल. परंतु,  तसे झाले तरी मी कार्य करायचा थांबणार नाही. जोपर्यंत जगाला आपण ईश्वराशी एकरूप आहोत असे ज्ञान होणार नाही तोपर्यंत मी सर्वत्र लोकांना स्फूर्ती देत राहील.

८)व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही; कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .

९) स्वतःचा विकास करा.  ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत .

१०)  देखणेपणावर जाऊ नका.सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

११) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

१२)द्वेष ,कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका.

१३)  मन समुद्रातल्या भोवऱ्यासारखे आहे. ते माणसाला दूर नेऊन बुडवते.  एक वेळ समुद्राला बांध  घालणे  सोपे असेल. पर्वत उपटने  सोपे असेल.  पण मनाला आवर घालणे  महाकठीण कर्म आहे.

१४)आपले मन आपल्या लाडक्या मुला प्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात त्याप्रमाणे आपले मन  नेहमी अतृप्त असते.  म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला.

१५) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे असले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक  तुमच्यात असली पाहिजे.

१६)  अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बल तेचे कारण बनते.

१७)सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव  सत्याचा त्याग करू नये.

१८) फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम, सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्य होत असतात.  म्हणून आपले  पौरूष प्रकट करा.

१९) दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे.

२०) माझ्या तरुण मित्रांनो ‘सामर्थ्यसंपन्न’ व्हा ,  हा माझा तुम्हाला उपदेश आहे.  गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकतात.  तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल.  तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल.

२) धर्म ही अशी वस्तू आहे हे जिच्यामुळे पशुचे माणसात आणि माणसाचे देवात रूपांतर होते.

२२) ईश्वराला आणखी कुठे शोधाल ? हे जे सर्व गरीब, दुःखी व दुर्बल आहेत तेच ईश्वर नव्हेत काय? आधी त्यांची पूजा का करीत नाही? गंगेच्या काठी विहीर खणावयास का म्हणून जातात?

२३) माझ्या मते आपले राष्ट्रीय महापातक जर कोणते असेल तर ते हेच की आपण सर्वसाधारण जनतेची उपेक्षा केली. आपल्या अधःपतनाचे हे एक प्रमुख कारण होय.  भारतातील सामान्य जनतेला जोवर चांगले शिक्षण देण्यात येत नाही,   जोवर तिला पोटभर अन्न मिळत नाही, जोवर तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही तोवर कितीही राजकारण केले तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही नाही.

२४) हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास  एखादा महामूर्ख देखील ते पार पाडू  शकतो: परंतु खरा बुद्धिमान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो, कि ते  त्याच्या आवडीचे होऊन जाते . कोणतेही कार्य शूद्र नाही हे ध्यानात  ठेवा.

२५)फक्त एकट्या आपल्यावरच साऱ्या कार्याची मदार आहे अशा भावनेने काम करा.  भावी पन्नास शतके तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहे. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे.  कंबर कसून कामाला लागा.

२६)जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही नाही तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधी एकाच पंखाने उडू शकत नाही.

२७) धर्म हा केवळ सिद्धान्तामध्ये , मतमतांतरामध्ये वा बौद्धिक वादविवादात नाही. आपण ब्रम्हस्वरूप आहोत हे जाणून तद्रूप होणे म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती होय.

२८) जीवन हे अल्पकाळ टिकणारे आहे. संसारातील असा सुखभोग क्षणभंगुर आहेत. दुसऱ्यासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, बाकीचे सारे जिवंत असूनही मेल्यासारखे होत.

२९) कुठल्याही स्वरूपात परावलंबी झालेला मनुष्य सत्यस्वरूप भगवंताची उपासना करूच शकत नाही.

३०) आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायूंची व पोलादी मज्जातंतूंची आवश्यकता आहे . आपण पुष्कळ दिवस रडलो. आता रडणे पुरे, आता आपल्या पायावर उभे राहा व मनुष्य बना .

३१) ‘माणसे’- खरी मनसे हवी आहेत; त्यानंतर सर्वकाही आपोआपच प्राप्त होईल. आपल्याला पाहिजे आहेत सामर्थ्यशाली , तेजस्वी, आत्मविश्वासी तरुण. असले शंभर युवक जरी मिळाले तरी जगात खरोखर क्रांती होऊन जाईल.

३२) उपनिषदांतील सत्ये तुमच्यासमोर आहेत.  ती ग्रहण करा, ती प्रत्यक्ष कार्यात उतरवा आणि मग भारताचा उद्धार अवश्य होईल.

३३) हे एक मोठे सत्य आहे; बळ हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू. बळ हाच परम आनंद होय. शाश्वत व अमर जीवन होय. दुर्बलता म्हणजे सतत भार, सतत चिंता, सतत दुःख होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय.

३४) अनुभव हाच जगात सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

३५) चारित्र्यसंवर्धन हा राष्ट्राचा खरोखर आधार आहे , पाया  आहे. राष्ट्राची उभारणी काही वाळूच्या भुसभुशीत जमिनीवर करता येत नाही. त्याच्यासाठी मजबूत कातळाची एक पायाभूमी असावी लागते आणि ती फक्त चारित्र्याद्वारेच निर्मिता येणे शक्य आहे.

३६) स्त्री पूजनाने सारे समाज थोर पदवीला पोहोचले आहेत. ज्या देशात, ज्या समाजात हे स्त्री पूजन नाही. तो देश , तो समाज कधीही मोठा होऊ शकला नाही व पुढे कधी काली होणेही शक्य नाही. तुमच्या साऱ्याच्या साऱ्या समाजाचा जो हा अधःपात झाला आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे या शक्तिरूपिणी स्त्रियांची अवहेलना होय.

३७)वेदान्त पापाचे अस्तित्व मानत नाही.  तो फक्त भ्रांतीचेच अस्तित्व मानतो आणि ‘मी कमकुवत आहे, मी पापी आहे,  मी दुःखी आहे,  माझ्या ठिकाणी बळ मुळीच नाही,  मी कोणतेही कार्य करण्यास समर्थ नाही’  असे म्हणणे हाच सर्वात मोठा भ्रम होय.  वेदांत आपल्याला हेच सांगतो.

३८) ‘ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक होय’ असे  प्राचीन धर्मांनी  म्हटले आहे. नवा धर्म म्हणतो की ‘ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही ते नास्तिक होत.’

३९) या जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता.  आपण शक्तीहीन आहोत म्हणूनच आपल्याला दुःख भोगावे लागते.  दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो,  चोरी करतो,   हत्या करतो,  व इतर गुन्हे करतो.  दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत  पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्युमुखी पडतो जिथे दुर्बल बनविणारी गोष्टच नाही तिथे मृत्यू कुठचा? दुःख कुठचे?

४०) उठा, धीट  बना,  शक्तिसंपन्न बना. तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून असा की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला हवे असलेले सर्व सहाय्य व सर्व बळ तुमच्यामध्येच आहे.  म्हणून तुम्हीच तुमच्या स्वतःचे भवितव्य घडवा.

४१)सर्वदा स्वतःला रोगी समजत राहणे हा काही रोग मुक्त होण्याचा उपाय नाही.  रोग दूर करण्यासाठी औषधाची आवश्यकता असते. दुर्बलतेची स्मरण करून दिल्याने काहीच लाभ होत नाही.  बळ द्या,  शक्ती प्रदान करा.  सर्वथा दुर्बलतेचा विचार केल्याने बळ प्राप्त होत नाही.  दुर्बलतेच सतत चिंतन करीत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही.  बळाचा नेहमी विचार करणे हाच उपाय आहे.

४२)  सर्व प्राण्यांपेक्षा, सर्व देवदेवतांपेक्षा मनुष्य हाच अधिक श्रेष्ठ आहे.  त्याच्या हून उच्च कोणीही नाही.  देवांना देखील पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि मानव देहांच्या द्वारे मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. केवळ मनुष्यालाच पूर्णत्वाचा लाभ करून घेता येतो देवदेवतांनादेखील नाही.

४३) स्वतः समोर ज्याने  एखादे ध्येय ठेवले आहे असा माणूस जर हजार चुका करीत असेल तर काहीच ध्येयं नसलेला  माणूस पन्नास हजार  चुका करीत असणार याची मला खात्री आहे.  आहे म्हणून स्वतः समोर कोणते ना कोणते ध्येय ठेवूणे  केव्हाही अधिक चांगले.

४४)  जोपर्यंत लाखो लोक भुकेने तडफडत आहेत व अज्ञानात पिचत पडलेले आहेत तोपर्यंत मी त्या प्रत्येक माणसाला कृतघ्न समजतो कि जो ह्या लोकांच्या बळावर सुशिक्षित बनला आणि तरी आता त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नाही.

४५) जो आज्ञेचे पालन करणे जाणतो तोच आज्ञा देणेही जाणतो. प्रथम आज्ञेचे पालन करावयास शिका. आपल्याला संघटनेची आवश्यकता आहे. संघटना हीच शक्ती आहे. आणि आज्ञाधारकपणा हेच तिचे रहस्य आहे,

४६) ज्यांना मानवजातीला सहाय्य करावेसे वाटते त्यांनी आधी आपल्या सुख-दुःखाचे, नावलौकिकाचे आणि सर्व प्रकारच्या स्वार्थी भावनांचे गाठोडे बांधून ते समुद्रात फेकून दिले पाहिजे. आणि मगच भगवंताकडे गेले पाहिजे. जगातील साऱ्या महापुरुषांनी हेच सांगितले आणि  हेच केले.

४७) जर काही भले व्हावे अशी आपली इच्छा असेल तर आपल्या या बाह्य अनुष्ठानांना तिलांजली द्या आणि जिवंत ईश्वराची, मानव-देवाची – ज्याने मानवरूप धारण केले आहे, अशा प्रत्येक जीवाची – भगवंताच्या समष्टी तसेच व्यष्टी रूपाची पूजा करा.

४८) दयेने प्रेरित होऊन  दुसऱ्यांचे भले करणे हे तर ठीकच आहे. पण ईश्वरबुद्धीने प्राणिमात्रांची केलेली सेवा हि त्याहून चांगली होय.

४९) तुम्हाला असे वाटते काय कि तुमची मदत मिळाली नाही तर एखादी मुंगी देखील मरेल? तसे वाटणे तर ईश्वराविषयी घोर अनादरच होय. वास्तविक पाहता जगाला तुमची मुळीच गरज नाही.

ईश्वराला मदत करण्याचे नव्हे तर ईश्वराचे कार्य करण्याचे सद्भाग्य तुम्हाला लाभले याबद्दल तुम्ही स्वतःला धान्य मानले पाहिजे. ‘मदत ‘ हा शब्दच आपल्या मनातून अगदी साफ काढून टाका. तुम्ही मदत करू शकत नाही. ‘

मी मदत करिन’ असे म्हणणेच मुळी ईश्वराविषयी अनादर दर्शविणे होय. खरे पाहता तुम्ही आपल्या सत्कर्मांच्याद्वारे ईश्वराचीच पुणे करीत असता. समग्र विश्वाविषयी असा भक्तियुक्त, आदरयुक्त भाव बाळगा, तरच तुम्ही पूर्ण अनासक्त होऊ शकता.

५०) जेव्हा स्वतःविषयीचा, स्वार्थाविषयीचा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही तेव्हाच आपल्या हातून सर्वोत्कृष्ट कर्म घडते, तेव्हाच आपला सर्वात जास्त प्रभाव पडतो. पूर्णपणे निरपेक्ष व्हा. फळाविषयी पूर्णपणे उदासीन राहा तेव्हाच तुम्ही यतार्थ कर्म करू शकाल.