“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला”, महिलाभगिनींनी व्यक्त केली भावना

WhatsApp Group

Majhi Ladki Bahin Yojana : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च, ज्येष्ठांचा औषधोपचार आदी बाबींबरोबरच महत्त्वाच्या व तातडीच्या गरजा भागविल्या जात आहेत. ही योजना आमच्यासाठी मोठा आधार असल्याची भावना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.

बुलढाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण समारंभ शारदा विद्यालयाच्या मैदानावर झाला. याप्रसंगी जिल्हाभरातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. समारंभात महिला भगिनींनी मोबाईल टॉर्च उंचावून व टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.

मान्यवरांनीही गुलाब पाकळ्या उधळून लाडक्या बहिणींचे स्वागत केले. अनेक भगिनींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या रकमेतून संसाराला आधार मिळाला आहे. त्याचप्रमाणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे महिलांचे सशक्तीकरण होत आहे, अशी भावना यावेळी भगिनींनी व्यक्त केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास झळकत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना व आनंद त्यांनी व्यक्त केला.