शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत श्रीकर भारतने RCBला मिळवून दिला थरारक विजय

WhatsApp Group

दुबई – दिल्लीविरूद्धच्या सामन्यात बंगळुरूच्या श्रीकर भारतने (Srikar Bharat) शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत संघाला थरारक विजय मिळवून दिला. दिल्लीने (Delhi Capitals) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 164 धावांचे आव्हान बंगळुरूसमोर ठेवले होते. बंगळुरूला (royal challengers bangalore) 164 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना भारतने आवेश खानच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत रोमहर्षक विजय मिळवून दिला.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 164 धावांचे आव्हाहन बंगळुरू समोर उभे केले होते. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामी फलंदाजांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. पृथ्वी शॉ 48 तर शिखर धवन 43 धावांवर बाद झाला. कर्णधार रिषभ पंत (10) आणि श्रेयस अय्यर (18) स्वस्तात बाद झाल्यानंतर हेटमायरने केलेल्या 29 धावांच्या जोरावर दिल्लीच्या संघाला 164 धावांपर्यत मजल मारता आली.

बंगळुरू संघाकडून दिल्लीने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडीकल शून्यावर तर विराट कोहली 4 धावांवर बाद झाला. एबी डिव्हिलियर्सने चांगली सुरवात करून दिली होती पण तो देखील 26 धावांवर बाद झाला.

भारत आणि मॅक्सवेलची शतकी भागिदारी ठरली निर्णायक

श्रीकर भारत आणि ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) शतकी भागिदारी या सामन्यासाठी निर्णायक ठरली. भारतने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. तर ग्लेन मॅक्सवेलनेही चांगली साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दोघेही चांगले खेळत असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचला असताना शेवटच्या 6 चेंडूत बंगळुरू विजयासाठी 15 धावांची गरज होती. मॅक्सवेलने पहिल्या चेंडूत चौकार मारला मात्र पुढील 4 चेंडूवर दोघांनाही मोठा फटका मारता आला नसल्याने सामन्याच्या अखेरच्या चेंडूत 5 धावांची गरज होती. या वेळी स्ट्राईकवर असलेल्या भारतने षटकार लगावत सामना जिंकवला.

बंगळुरूसाठी भारतने 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली.