IPL 2022: RCBच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या बहिणीचे निधन, आयपीएल सोडून तातडीने घरी रवाना

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि त्यांच्या एका खेळाडूसाठी वाईट बातमी समोर आली आहे. आरसीबीचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन झाले आहे. या बातमीनंतर हर्षल पटेल बायो-बबलमधून बाहेर पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल पटेलने संघ अर्धवट सोडला असून तो घरी परतला आहे. तो काही सामने आता बाहेर असणार आहे. हर्षलच्या बहिणीचा शनिवारीच मृत्यू झाला होता. काही दिवसांपासून त्याच्या बहिणीची प्रकृती ठीक नव्हती.

आरसीबी संघ शनिवारीच मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला. यामध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर हर्षल पटेललाही त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाल्याची बातमी मिळाली. यानंतर तो थेट घरी गेला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलने 4 षटकात 23 धावा देत 2 महत्त्वपूर्ण बळी घेतले.

आयपीएलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की, दुर्दैवाने हर्षलला त्याच्या बहिणीच्या निधनामुळे बायो-बबल सोडावे लागले. पुढील सामना खेळण्यासाठी तो पुन्हा संघात सामील होईल. पुढील सामना 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे.

हर्षल पटेल परतल्यावर त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. यादरम्यान त्याच्या काही कोरोना चाचण्याही होतील. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये पुन्हा प्रवेश मिळेल.