Jamnagar Assembly Election Result: रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी
गुजरातमधील जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांच्यावर 40,963 मतांनी विजय मिळवला आहे. जामनगर उत्तर विधानसभा जागेवर एकूण मतदानापैकी 65.5 टक्के मते भाजपला मिळाली. या विधानसभा मतदारसंघात एकूण 2,63,483 मते आहेत. त्यापैकी 1,34,765 पुरुषांसाठी, तर 1,28,717 महिलांसाठी आहेत. रिवाबा यापूर्वी करणी सेनेच्या सदस्या होत्या. 2018 मध्ये त्यांना करणी सेनेच्या महिला शाखेच्या अध्यक्षपदी करण्यात आले होते. या जागेवरून रिवाबाला उभे करण्यासाठी भाजपने आमदार धर्मेंद्रसिंह एम. जडेजा यांचे तिकीट कापले होते. आता रिवाबा जडेजाने ही जागा जिंकून पक्षाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आहे.
भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाली. त्यावेळी रिवाबा आणि रवींद्र जडेजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटोही व्हायरल झाला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिवाबा जडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघात सक्रिय राहिले.
रिवाबा जडेजाने जामनगर उत्तरमध्ये महिलांसाठी खूप काम केले आहे. रिवाबा आणि 32 वर्षीय रवींद्र जडेजा यांचा विवाह 2016 मध्ये झाला होता. रिवाबाने राजकोटच्या आत्मिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्समधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. 1990 साली राजकोटमध्ये जन्मलेल्या रिवाबाचे वडील गुजरातचे खूप मोठे उद्योगपती आहेत.