
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला असं म्हटलं जातं आहे. मात्र रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांना इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी काल अमरावतीमध्ये झालेल्या सभेत बोलताना, “पहिली वेळ असल्यामुळे यांना माफ करतो”, असे विधान केले होते. यावर आता रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रवी राणा यावेळी बोलताना म्हणाले, “मी स्वत: पुढे येऊन हा वाद मिटवलेला आहे. पण जर कोणी मला दम देत असेल. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. मग बच्चू कडू तर काहीच नाहीयत. ते दम देऊन बोलत असतील तर त्यांना देखील जशास तसं उत्तर देण्याची तयारी आहे. मग ते उत्तर कोणत्याही पातळीवर असूदे. मी उत्तर देईन.
ते पुढे म्हणाले, ते प्रेमाची भाषा बोलले तर मी दहा वेळा झुकायला तयार आहे. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे”, असा घणाघात रवी राणा यांनी यावेळी केला.
“मंत्री बनणं किंवा न बनणं हे माझ्यावर नाहीय. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. माझे नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आहेत. त्या दोन्ही नेत्यांचा आदर-सन्मान करुन मी माफी मागितली. आणि दिलगीरी व्यक्त केली आहे. कुणाचेही मन दुखू नये म्हणून तो विषय मी संपवला आहे”, असं रवी राणा म्हणाले.