”खरी शिवसेना कोणती आहे, हे…”, चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

WhatsApp Group

मुंबई: पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना हे नाव वापरू शकत नाही असंही सांगितलं आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी आज सुनावणीसाठी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयात जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी ‘हौसले बुलंद है’ अशा अशी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात याही पेक्षा जास्त सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’ असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यामध्ये नवीन असं काही नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.