रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान Ratan Tata Udyog Ratna Award
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.
मुंबई : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समुहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास हे नाते आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंची वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तत्पूर्वी श्री. टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी श्री. टाटा यांच्यासमवेत श्री. चंद्रशेखरन आदींशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली.
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार उद्या रविवारी (दि.२० ) समारंभपूर्वक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. हा समारंभ वांद्रे-कुर्ला संकुलमधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता होणार आहे.
‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरूप १५ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र, ”उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरूप ५ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरूप ५ लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
An iconic Indian Industrialist Shri. #Ratan_Tata today honoured with the #Udyog_Ratna_Award. This prestigious recognition is a well-deserved honour for a true titan of innovation… pic.twitter.com/RJ9lvDTDWM
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 19, 2023