कोल्हापुरमध्ये शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात

WhatsApp Group

कोल्हापूर – राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. मराठा समाजाच्या यामुद्द्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पासून आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत मुंबईमधील आझाद मैदानामध्य आमरण उपोषणासाठी बसले आहेत.

संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून समर्थन मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज, शनिवार पासून दसरा चौकामध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, आंदोलकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुल येथे रास्ता रोको केला. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिवाजी पुलावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावरुन आता मराठा बांधवांनी याठिकाणी रास्ता रोको केला.

दरम्यान, राज्य शासनाने याआधीच या आंदोलनाची दखल घेत काल, शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या आहेत मागण्या

  • ‘सारथी’ संस्थेचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून त्यांना सगळ्या सुविधा देऊन कामकाजाला गती द्यावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ नेमावा.
  • मराठा आरक्षणानंतर नोकरी मिळाल्यांच्या नेमणुका रद्द् केल्या आहेत. त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे.
  • मराठा आरक्षणासाठी हुत्मामा झालेल्या ४० जणांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीत सामील करा.
  • कोपर्डी येथील प्रकरणाची सुनावणी गतीने घ्या.