अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीम इंडियात पुनरागमनाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रहाणे मुंबईच्या दुसऱ्या रणजी सामन्यात हैदराबादविरुद्ध 204 धावा करून बाद झाला. रहाणेने आपल्या डावात 261 चेंडू खेळले तर 253 चेंडूत द्विशतक झळकावले. यादरम्यान उजव्या हाताच्या या फलंदाजाने 26 चौकार आणि 3 षटकारही ठोकले. कालच्या 139 धावांच्या पुढे खेळताना आज दुसऱ्या दिवशी रहाणेने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. याशिवाय यशस्वी जैस्वाल (162) आणि सर्फराज खान (126*) यांच्या शतकांमुळे मुंबईने 651/6 या मोठ्या धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
अजिंक्य रहाणे एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग मानला जात होता. पण 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकल्यापासून तो अतिशय खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो शेवटचा खेळला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने एकूण 10 धावा केल्या. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता या खेळीमुळे त्याने फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. यासह, या खेळीतून रहाणेवर आगामी आयपीएल 2023 च्या लिलावाकडेही लक्ष असेल.
Ajinkya Rahane gets his Double Century #RanjiTrophy pic.twitter.com/tnP98uiPqd
— Jigar Mehta (@jigsactin) December 21, 2022
आंतरराष्ट्रीय विक्रमांबद्दल बोलायचे झाल्यास, अजिंक्यने आतापर्यंत 82 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतके आणि 25 अर्धशतकांच्या मदतीने 38.52 च्या सरासरीने 4931 धावा केल्या आहेत.
यशस्वी जैस्वालचे शतक
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपला सुरेख फॉर्म कायम ठेवत 195 चेंडूत 162 धावांची खेळी केली. बीकेसी मैदानावर हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पृथ्वी शॉला (19) लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर यशस्वीने सूर्यकुमारसोबत दुसऱ्या विकेटसाठी 153 धावांची आणि रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करत मुंबईला मजबूत स्थितीत आणले.