”उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा…”, रामदास कदमांची ठाकरेंवर टीका

WhatsApp Group

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात येत आहे. दापोलीमध्ये शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? अशी विचारणा देखील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली.

आपल्या मुलाचं करिअर संपवण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रुग्णालयामध्ये आखल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार रामदास कदम यांनी यावेळी केला. तसंच माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? अशीही विचारणा त्यांनी केली.

रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन पुढे चाल, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत असं ते सांगत असतील. पण आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत? आणि त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत आहे, असा टोला रामदास कदम यांनी यावेळी बोलताना लगावला.

ते पुढे म्हणाले, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हटलं असं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?,” अशी विचारणा देखील रामदास कदम यांनी केली.