Rakhi Sawant: चाळीतलं घर ते दुबईतले बंगले! राखी सावंतने सांगितली तिच्या स्ट्रगलची ‘एक्स्क्लुझिव्ह’ गोष्ट
मुंबई: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत ही केवळ तिच्या वादांमुळेच नाही, तर तिच्या रोखठोक स्वभावामुळेही कायम चर्चेत असते. आज राखीकडे स्वतःची आलिशान घरे आणि प्रसिद्धी असली, तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने केलेला संघर्ष खूप मोठा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर आणि बॉलिवूडमधील तिच्या प्रवासावर भाष्य केले आहे.
लहानपणापासूनच केला प्रचंड संघर्ष
‘इट्स मज्जा’च्या ‘Behind The Fame’ या पॉडकास्टमध्ये बोलताना राखीने सांगितले की, तिचा प्रवास एका लहानशा चाळीतून सुरू झाला. सिनेइंडस्ट्रीत कोणतीही ओळख नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर तिने आपली जागा निर्माण केली. “मी आई-बाबांना बघू, भावंडांना बघू की स्वतःचं लग्न आणि मुलांकडे लक्ष देऊ? मी खूप त्रास सहन केला आहे,” असे म्हणत तिने आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव करून दिली.
“राखी सावंत तिथेच आहे!”
बॉलिवूडमध्ये स्वतःची इमेज तयार करण्याबाबत बोलताना राखी म्हणाली, “रात्रंदिवस एक करून, छोटे कपडे घालून मी आयटम गर्ल, रिॲलिटी शो क्वीन किंवा बेधडक त्सुनामी म्हणून ओळख बनवली आहे. आजवर अनेक मुली आल्या आणि गेल्या, पण राखी सावंत अजूनही तिथेच पाय रोवून उभी आहे. कोणत्याही शोमध्ये मला पाठवा, मी तो गाजवूनच येणार.” ३६ येतात आणि ३६ जातात, पण आपली जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.
प्रेक्षकांचे मानले आभार
राखीला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते, तिला कोणी गांभीर्याने घेत नाही, असे म्हटले जाते. मात्र, मनोरंजनाच्या बाबतीत तिचा हात कोणीही धरू शकत नाही. राखीने यावेळी तिच्या चाहत्यांचे आभार मानले. “माझ्या प्रेक्षकांना माझा सलाम आहे, कारण ते माझ्यावर खूप प्रेम करतात,” असे ती भावूक होऊन म्हणाली. आज संघर्षाच्या जोरावर राखी यशाच्या शिखरावर असून दुबईत तिची स्वतःची घरे आहेत.
