
Rajya Sabha Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीबाबत देशभरात उत्सुकता लागली आहे. मतदान आणि निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीअंतर्गत 15 राज्यांत एकूण 57 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 41 सदस्य बिनविरोध निवडून आले. अशा स्थितीत आता केवळ 16 जागांवर निवडणूक होणार आहे.
या सर्व 16 जागांसाठी चार राज्यांमध्ये 10 जून रोजी मतदान होत आहे. तसेच, उद्याच सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत हॉर्स ट्रेडिंग आणि क्रॉस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्ष आपापल्या आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात पक्षांतर्गत हेराफेरीचे राजकारणही सुरू आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना रिसॉर्ट किंवा अन्य ठिकाणी एकत्र ठेवले आहे. निवडणुकीच्या दिवशी त्यांना थेट मतदानासाठी नेले जाईल.
पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, काँग्रेस नेते जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, अजय माकन, संजय राऊत, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे नेते आज (शुक्रवारी) होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत.