
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक शिवसेना (Shiv Sena Party) पदाधिकारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होत आहेत. दुसऱ्या बाजूला आपली वाट चुलल्याचे लक्षात येताच पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साद घालत मूळ शिवसेना पक्षात परतणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले राजू विटकर (Raju Vitkar) हेसुद्धा पुन्हा असेच शिवसेनेत परतले आहेत. शिवसेनेमध्ये परतलेल्या विटकर यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा पक्षात बोलवा अशी आर्त हाकही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातली आहे.
बंडखोर शिवसेना आमदारांनीही पुन्हा पक्षात यावे असं अवाहनही राजू विटकर यांनी केले आहे. हे अवाहन करताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर विटकर यांचे डोळे भरुन आले.
राजू विटकर म्हणाले, मी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला नको होते. मी मूळ पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची साद सोडण्याची आवश्यकता नव्हती. घडल्या गोष्टीचा मला पश्चाताप होत आहे. मी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करुन घरी आलो तेव्हा माझ्या कुटुंबीयांनाही माझा निर्णय आवडला नव्हता. माझ्याच घरातील लोकांनी मला सांगितले की आपण योग्य निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडायला नको होते. शिवसेना पक्षाने आपल्याला काहीही कमी केले नाही. जर पक्षाने आपल्याला काहीच कमी केले नाही तर मग आपण हा निर्णय का घ्यायचा? घरातूनच असं म्हटल्यानंतर मलाही माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला, असे विटकर म्हणाले.