पुणे: क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा युवा लीग २०२३” यास्पर्धाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रो कबड्डी व आंतरराष्ट्रीय खेळाडू रिशांक देवाडिगा व विशाल माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर महिलांच्या प्रेक्षणीय सामन्यांच्यावेळी विधानसभा आमदार जयंतराव पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ संघ विरुद्ध महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या झालेल्या प्रेक्षणीय सामन्यांत राजमाता जिजाऊ संघाने एकतर्फी विजय मिळवला. मध्यंतरापर्यत २२-०६ अशी आघाडी राजमाता जिजाऊ संघाकडे भक्कम आघाडी होती. मंदिरा कोमकर व सलोनी गजमल यांच्या चतुरस्त्र चढायांच्या समोर महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ मध्यंतराला पर्यत २ वेळा ऑल आऊट झाला.
राजमाता जिजाऊ संघाच्या मंदिरा कोमकरने सुपर टेन पूर्ण करत सामना एकतर्फी केला. राजमाता जिजाऊ संघाच्या प्रियांका मंगळेकर व कोमल अवाले यांनी प्रत्येकी ४-४ पकडीत गुण मिळवले. महेश दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन कडून दीपाली काजले हिने एकाकी झुंज दिली. राजमाता जिजाई संघाने ३९-१३ असा एकतर्फी विजय मिळवत क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज महिलाच्या प्रेक्षणीय सामन्यांचे विजेतेपद पटकावले.
- सर्वात्कृष्ट चढाईपटू- मंदिरा कोमकर , राजमाता जिजाऊ संघ
- सर्वात्कृष्ट पकडपटू- प्रियांका मंगळेकर, राजमाता जिजाऊ संघ
- कबड्डी का कमाल- कोमल अवाळे, राजमाता जिजाऊ संघ
“क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा युवा लीग २०२३” या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित १६ जिल्ह्याचे संघ सहभागी होणार असून हे संघ पहिल्या फेरीसाठी दोन गटात विभागले असून अ गटातील साखळी पद्धतीने होणारे २८ सामने उद्यापासून ३० मार्च ते ५ एप्रिल २०२३ दरम्यान होणार आहेत. पहिला सामना यजमान जिल्हा पुणे जिल्हा पालनी टस्कर्स विरुद्ध कोल्हापूर जिल्हा ताडोबा टायगर्स यांच्यात लढत होणार आहे. प्रत्येक दिवशी एकूण ४ सामने खेळवले जातील.
ब गटातील सामन्यांची सुरुवात ६ एप्रिल २०२३ पासून नाशिक जिल्हा द्वारका डिफेन्सर्स विरुद्ध परभणी जिल्हा पंचाला प्राइड या लढतीने होणार आहे. १२ एप्रिल २०२३ पर्यत ब गटातील साखळी सामने पूर्ण होतील. १३ एप्रिल २०२३ पासून १९ एप्रिल २०२३ पर्यत दोन्ही गटातील टॉप ४-४ संघ प्रोमोशन राऊंडचे सामने खेळतील. त्यानंतर २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२३ दरम्यान दोन्ही गटातील बॉटमचे ४-४ संघ रेलेगशन राऊंडचे सामने खेळतील. टॉप १० संघाच्या मध्ये २७ एप्रिल ते १ मे २०२३ दरम्यान प्ले-ऑफसचे सामने व अंतिम सामना होईल.