राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी

WhatsApp Group

आयपीलच्या पंधराव्या हंगामाचे अर्धे सामने संपले आहेत. काही संघांनी आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. तर मुंबई आणि चेन्नईसारखे दिग्गज संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहेत. आयपीएलच्या पहिल्याच हंगामामध्ये ट्रॉफीवर नाव कोरणारा राजस्थान रॉयल्स हा संघ तर यावेळी गुणतालिकेत अग्रस्थानी आहे.

राजस्थानचा संघ विजयासाठीचा प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या संघाने ऑस्ट्रेलियचा महान दिवंगत क्रिकेटर शेन वॉर्नला श्रद्धांजली अर्पण करण्याचे ठरवलं आहे. येत्या ३० एप्रिल रोजीच्या सामन्यादरम्यान राजस्थान संघ वॉर्नला आदरांजली अर्पण करेल.

शेन वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेतलेल्या आहेत. तर १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये वॉर्नच्या नावावर २९३ विकेट्स आहेत. क्रिकेटसाठीच्या त्याच्या याच योगदानामुळे ३० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सचा संघ शेन वॉर्नला श्रद्धांजली अर्पण करणार आहे. या दिवशी राजस्थानचा सामना मुंबई इंडियन्ससोबत पुण्यातील डी वाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियमवर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे खेळाडू त्यांच्या जर्सीच्या कॉलरवर ‘SW23’ ही अक्षरं लावून मैदानामध्ये उतरणार आहेत. शेन वॉर्नसाठी ही विशेष श्रद्धांजली असेल. महत्वाचे म्हणजे शेन वॉर्नचा भाऊ जेसन वॉर्नदेखील या सामन्याला हजेरी लावणार असून त्याने आमंत्रण स्वीकारलेले आहे.