Rajasthan vs Bangalore : बंगळुरूचा पराभव करत राजस्थानची IPL च्या अंतिम फेरीत धडक

WhatsApp Group

जोस बटलरच्या नाबाद १०६ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने बंगलोरवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCB ने २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने ‘रॉयल’ विजय मिळवला आहे. या विजयाचा बॉस जोस बटलर ठरला आहे. बटलरने हंगामातील चौथे शतक ठोकले आणि राजस्थानला तब्बल १४ वर्षांनी IPL च्या फायनलमध्ये पोहोचवले. या आधी २००८ च्या हंगामात राजस्थानचा संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचला होता. ती फायनल राजस्थानने जिंकली होती. आता २९ मे रोजी राजस्थानचा संघ फायनलमध्ये गुजरात विरूद्ध खेळणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरूद्ध विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस दोघे सलामीला आले. विराट ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर डू प्लेसिसची संथ खेळी २५ धावांवर संपुष्टात आली. ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदारने तुफान फटकेबाजीला सुरूवात केली होती. पण मॅक्सवेल २४ धावांवर तंबूत परतला. रजत पाटीदारने मात्र ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर RCBचा डाव गडगडला. महिपाल लोमरोर (८), दिनेश कार्तिक (६), वानिंदू हसरंगा (०), हर्षल पटेल (१) दोघे झटपट बाद झाले. शाहबाज अहमदने नाबाद १२ धावा करत संघाला १५० पार मजल मारून दिली.

आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने धडाकेबाज सुरूवात केली. त्याने १३ चेंडूत २१ धावा केल्या. त्यात २ षटकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने २१ चेंडूत २ षटकार व एका चौकारासह २३ धावा केल्या. जोस बटलरने मात्र आपली तुफानी खेळी सुरूच ठेवली. देवदत्त पडिक्कलला १२ चेंडूत ९ धावाच करता आल्या. पण बटलरने मात्र एकतर्फी सामना जिंकवून दिला. त्याने आधी २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर तीच लय कायम ठेवत दणदणीत शतक ठोकलं. त्याचं हे यंदाच्या हंगामातील चौथं शतक आहे. एकाच हंगामात सर्वाधिक शतक ठोकण्याच्या विराटच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली आहे.