IPL 2022; राजस्थानचा कोलकातावर सात धावांनी विजय, युझवेंद्र चहलने एकाच षटकात घेतल्या 4 विकेट्स

WhatsApp Group

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 30 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 5 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 19.4 षटकांत केवळ 210 धावाच करू शकला. राजस्थानने हा सामना 7 गडी राखून जिंकला. युजवेंद्र चहलला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी या सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

या सामन्याच्या दुसऱ्या डावात चहलने 17 वे षटक टाकले जे पूर्णपणे कोलकातासाठी घातक ठरले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चहलने व्यंकटेश अय्यरला संजू सॅमसनवी 6 धावांवर यष्टिचित केले. दुसऱ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही तर या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धाव घेतली. चौथ्या चेंडूवर त्याने प्रथम वाईड टाकला, पण पुन्हा याच चेंडूवर चहलने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला 85 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. पाचव्या चेंडूवर त्याने रियान पराग आणि त्यानंतर सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्स यांना बाद केले, म्हणजेच या दोघांनाही आपले खातेही उघडता आले नाही. चहलने या षटकात एकूण चार बळी घेतले ज्यात हॅट्ट्रिकचा समावेश आहे.

चहलच्या हॅट्ट्रिकनंतर आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध मखाया एनटिनी आणि प्रवीण तांबे यांनी हॅट्ट्रिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर चहल हॅट्ट्रिक घेणारा राजस्थानचा पाचवा गोलंदाज ठरला. राजस्थानसाठी या लीगमध्ये अचित चंडिला, प्रवीण तांबे, शेन वॉटसन आणि श्रेयस गोपाल यांनी चहलच्या आधी हॅटट्रिक घेतली आहे. त्याचबरोबर चहल आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा 21वा गोलंदाज ठरला.

सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 5 विकेट गमावत 217 धावा केल्या. बटलरने 61 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 103 धावांची शानदार खेळी करत केकेआरच्या गोलंदाजांची कोंडी केली. याशिवाय संजू सॅमसनने 38 आणि शिमरॉन हेटमायरने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेनने सर्वाधिक दोन खेळाडूंना बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 19.4 षटकांत 210 धावांत आटोपला आणि 7 धावांनी पराभूत झाला. केकेआरकडून श्रेयस अय्यरने 85 आणि अॅरॉन फिंचने 58 धावांचे योगदान दिले.