
सावंतवाडी – भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कोण नव्याने पक्षामध्ये आले तर पक्षाची ताकद वाढत असते. मात्र त्यांनी जनतेमध्ये जाऊन पहिले काम केले पाहिजे असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे.
तसेच युवराज लखम सावंत भोसले पक्षात आले म्हणून नगरपालिका निवडणूक जिंकणार असं नाही, ते आले नसते तरी निवडणूका पक्ष जिंकणारच होता असंही तेली म्हणाले. ते बुधवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
राजन तेली म्हणाले, कुडाळ येथील महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात सत्ताधारी आमदार पाच लाख मागितल्याचा दावा करतात. तर दुसरीकडे सावंतवाडी महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करतात. मात्र त्यानंतर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे नंतर त्यांच्याशी तडजोड करतात की काय? असा सवाल राजन तेली यांनी केला. सगळीकडे अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस व महसूल यंत्रणेचा पूर्ता दुर्लक्ष आहे. वेत्ये येथील दगड खाणीमुळे भविष्यात अपघात होऊ शकतो असा आरोप त्यांनी यावेळी केला.
भाजपमध्ये युवराज लखम सावंत-भोसले यांनी प्रवेश केला. याबाबत राजन तेली यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षात येणाऱ्या सर्वांचा सन्मान केला जाणार. कोणी घराणे आले म्हणून पक्ष मोठा होत नसतो. पक्ष हा संघटना आणि शिस्त यावर मोठा होतो.
भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष असून पक्षशिस्त सर्वांनाच पाळावी लागते. लखम सावंत-भोसले आले याचा आम्हाला आनंद आहे. मात्र ते आले नसते तरी सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता आली असती असा दावाही तेली यांनी केला.
या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश सारंग, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, अजय गोंधावळे, सत्यवान बांदेकर, महेश धुरी, बाळा पालेकर आदी उपस्थित होते.