
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे.
राज ठाकरे यांचं पत्र
ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. हेही वाचा – शोधून आणणाऱ्याला 11 रू बक्षीस, मुंबईत भास्कर जाधवांविरोधात बॅनरबाजी
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा. हेही वाचा – Travel Now Pay Later: प्रवाशांसाठी नवीन सुविधा, आधी प्रवास करा भाड नंतर द्या
दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती.