३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार – राज ठाकरे
ठाणे – गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे. त्याआधी राज्य सरकारने सर्व मौलवींना बोलावून भोंगे हटवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा नाहीतर ३ मेनंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “मशिदींवरील भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होतोय. यामध्ये धार्मिक विषय कोठे आहे? तुम्हाला जो नमाज पढायचा आहे, अजान द्यायची आहे ते घरामध्ये करा. शहरांचे रस्ते, फूटपाथ का अडवताय? प्रार्थना तुमची आहे, मग आम्हाला का ऐकवताय? हे भोंगे खाली उतरवले पाहिजे, आम्हाला याचा त्रास देऊ नका हे सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारचं. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नाहीच, हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टीचा त्रास होतो. तुम्ही दिवसभरामध्ये ५-५ वेळा नमाज पढता, बांग देता. एकतर सगळे बेसूर असता. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावर घाण झाली तर आपण तो रस्ता साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
आज तुमचा रमजान सुरू आहे आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो. १० दिवस आम्ही समजू शकतो, तरीही १० दिवस लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे तो भाग वेगळा आहे. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो, पण तुम्ही जेव्हा ३६५ दिवस लाऊड स्पिकरमधून या गोष्टी ऐकवतात कशासाठी, कोणासाठी?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.