राज ठाकरे करणार महाआरती; १६ एप्रिलला पुण्यात मनसेकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण

WhatsApp Group

पुणे – मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यामध्ये (Pune) महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) सामूहिक पठण देखील करण्यात येणार आहे. शनिवारी (१६ एप्रिलला) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिरामध्ये ही आरती होणार आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेश मनसैनिकांना दिला होता. तर ठाण्यामध्ये झालेल्या सभेत ३ में पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे.

त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. दरम्यान त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यामध्ये आहेत. दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत.