
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून काढून टाकले तर राज्यात पैसा उरणार नाही असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर राज ठाकरे भडकले आहेत. मराठीत एक पोस्ट शेअर करत राज ठाकरेंनी ‘मराठी माणसाला मूर्ख बनवू नका’ असं कॅप्शन दिलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर त्यावर बोलू नका, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका.राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?
“मराठी माणसाला डिवचू नका!” pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022
उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.
अंधेरी, मुंबई येथे एका चौकाला स्वर्गीय शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात राज्यपालांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राज्यपाल कोश्यारी बोलतात की, “जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले, तर तुमच्याकडे एकही पैसा उरणार नाही.”