Raj Thackeray: “कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात हेच कळेना”, नाशिकमध्ये राज ठाकरेंचा भाजपावर तोफखाना

WhatsApp Group

नाशिक: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपा आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असा काही गोंधळ सुरू आहे की, नक्की कोण कोणत्या पक्षात आहे हेच कोणाला कळेनासे झाले आहे,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सद्यस्थितीवर भाष्य केले. विशेष म्हणजे, या सभेला शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळात या सभेची मोठी चर्चा रंगली आहे.

सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी निवडणुका रखडण्यावरून सरकारला धारेवर धरले. “चार वर्षांपूर्वी मुदत संपूनही निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. जनतेला निवडणुकांपासून वंचित ठेवण्याचे कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील पक्षांतराच्या खेळावर टीका करताना ते म्हणाले, “मी मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत हेच कळत नाही. प्रत्येक नेत्याला रोज विचारावं लागतं की आज तू नक्की कुठे आहेस?”

एबी फॉर्म गिळणाऱ्या ‘वेड्यापिशा’ राजकारण्यांचा समाचार

नुकत्याच घडलेल्या एका विचित्र घटनेचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी राजकारणाची पातळी कशी घसरली आहे, यावर टीका केली. “निवडणुकीसाठी काही लोक इतके वेडेपिसे झाले आहेत की, एकाने तर छाननीच्या वेळी समोरच्या उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’च हिसकावून घेतला आणि चक्क गिळून टाकला! जर एखाद्या दिवसाचा वेळ असता, तर किमान सकाळी तरी तो फॉर्म बाहेर पडला असता, पण ती वेळही त्यांना मिळाली नाही,” असा टोला लगावताच सभेत एकच हशा पिकला.

१५ कोटींच्या ऑफर; “येतात कुठून एवढे पैसे?”

निवडणुकीतील पैशांच्या वारेमाप वापरावरून राज ठाकरेंनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “कल्याण-डोंबिवलीमध्ये एकाच घरातील तीन जण निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांना चक्क १५ कोटींची ऑफर देण्यात आली. कुणाला एक कोटी, कुणाला पाच कोटी… हे आकडे ऐकून सामान्य माणूस चक्रावून जातोय. हे इतके पैसे येतात कुठून?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. पैशांच्या जोरावर आणि दहशतीने निवडणुका बिनविरोध केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.