मनसेला मोठा दणका; मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा!

WhatsApp Group

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. लोकांमधून देखील यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे राज्यातील सत्ताधारी पक्षांनी या भूमिकेला तीव्र विरोध केला तर दुसरीकडे खुद्द मनसेमधूनच राज ठाकरेंच्या भूमिकेला कडवा विरोध पाहायला मिळत आहे.

सुरुवातीला पुण्यामधील मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीच विरोध केला होता. मात्र, त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर मनसेच्या मुस्लीम बांधव पदाधिकाऱ्यांमध्ये या निर्णयावरून नाराजी असल्याचे चित्र या राजीनाम्यांमुळे निर्माण झाले आहे.

मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही तर त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचे आवाहन राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यामध्ये केले होते. त्यानंतर ठाण्यामध्ये घेतलेल्या उत्तर सभेमध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज ठाकरेंनी राज्य सरकारला भोंग्यांविषयी निर्णय घेण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

मात्र, राज ठाकरे यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातील मुस्लीम बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.गुरुवारी मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला होता.

यानंतर इरफान शेख यांच्याप्रमाणेच मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई व मराठवाडा विभागामधील एकूण ३५ मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.