
रत्नागिरी – महाविकास आघाडीमधील दुसरा महत्वाचा घटकपक्ष आणि शिवसेनाचा सध्याचा सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने टीका करत आहे. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या विषयांवरुन मनसे आणि भाजापा विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष रंगल्याचं चित्र दिसत आहे.
असं असतानाच आता शिवसेनेचे रत्नागिरीमधील खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे.
दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची परंपरा मागील अनेक वर्षांपासून आहे. आज सुद्धा भाजपाच्या तालावर नाचताना केवळ आणि केवळ बंधू द्वेष आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी म्हटळे जाते तसे आहे हे. आपला भाऊ म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी बसल्यानंतर आणि केवळ बसल्यानंतर नाही तर देशातील कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशंसा झालेली आहे.
आपला भाऊ मुख्यमंत्री पदी बसला हा द्वेष त्यांना सतावतोय. त्यामधून त्यांच्या मनात द्वेष निर्माण झालाय म्हणून उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हा राज ठाकरेंचा थयथयाट सुरु आहे, असा टोला विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.