मुंबई, पुण्यासह कोकणात जोरदार पावसाची हजेरी, काही भागांमध्ये दिवसभर सूर्यदर्शनही नाही!

WhatsApp Group

मुंबई – दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीपवर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आज हवामानाचा रंग बदलताना दिसत आहे. आज उत्तर कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यात सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे तापमानात घट दिसून येत आहे.

आज कामाच्या दिवसामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे पुणे आणि मुंबईतील रस्त्यांवरही वाहतूककोंडीचा वेग दिसत आहे. या शहरांव्यतिरिक्त नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, जालना आणि बीड जिल्ह्यातही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यात मंगळवारी दिवसभर पुण्यात कमाल 35 अंश सेल्सिअस आणि किमान 10.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबई, पुण्यासह तळकोकणातील काही तालुक्यांमध्ये पावसाने कालपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. हा अवेळी पाऊस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाकडून उद्या पासून 5 दिवस महाराष्ट्र राज्यात पावसाची तीव्रता कमी होईल असं सांगण्यात आलं आहे.


यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल 30.1 मिमी पावसाची नोंद झाली असून, हवामान खात्याकडून सांगण्यात आले की, दक्षिणपूर्व अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे, त्यामुळे हा अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही भागांमध्ये दिवसभर सूर्याचे दर्शन होत नाही.

मच्छिमारांना पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा
पुढील काही दिवस हवेचा वेग जास्त असण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी महाराष्ट्र आणि गोवाच्या समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस समुद्रात हवेचा वेग जास्त असण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांना हा इशारा देण्यात आला आहे.