दिल्ली – कोरोनामुळे नियमित रेल्वे गाड्यांना बंदी घालण्यात आली होती. त्याऐवजी विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. पण आता कोरोना नियंत्रणात असल्याने आणि परिस्थितीही बरीच सुधारली आहे, अशा परिस्थितीत मोठा निर्णय घेत रेल्वे मंत्रालयाने पुन्हा नियमित रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. काही दिवसांमध्ये 1700 हून अधिक गाड्या नेहमीच्या गाड्यांप्रमाणे पूर्ववत केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
नियमित रेल्वे गाड्या सुरू होतील
रेल्वे मंत्रालयाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, आता पुन्हा कोरोनापूर्वीचे दर लागू करण्यात आले आहेत. म्हणजे आजवर जे स्पेशल भाडे घेतले जात होते ते आता बंद करून नियमित भाडे आकरण्यात येणार आहे. आधीच बुक केलेल्या रेल्वे तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही, तर कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत यावरही जोर देण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंत खूप बदल केले आहेत पण कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून नियम मोडल्यास कारवाई केली जाईल. 25 मार्च 2020 रोजी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. 166 वर्षात पहिल्यांदाच ट्रेनचे कामकाज थांबले होते. पण नंतर माल गाड्या आणि नंतर मजूर गाड्या चालवण्यास परवानगी देण्यात आली. नंतर विशेष गाड्या सरू केल्या आणि नियमित गाड्यांची संख्या बदलण्यात आली. पण आता कोरोनाची परीस्थिती नियंत्रणात येत असल्याने रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.