सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?… विधान भोवलं; राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा

0
WhatsApp Group

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी केलेल्या या वक्तव्याबद्दल सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती, त्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज म्हणजेच गुरुवारी सुरत सत्र न्यायालयाने निकाल देताना राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. निकाल सुनावण्यात आला तेव्हा खुद्द राहुल गांधीही कोर्टात हजर होते. मात्र, शिक्षेची घोषणा झाल्यानंतर राहुल गांधींना जामीनही मिळाला आहे.

राहुलच्या वकिलाने सांगितले की, राहुल गांधी कोर्टात जाताच दोन मिनिटांनी कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना शिक्षेबद्दल काय म्हणायचे आहे असे विचारले असता, राहुल गांधी यांनी उत्तर दिले की ते जे काही बोलले ते विरोधी पक्षनेते म्हणून भ्रष्टाचार उघड करण्याच्या उद्देशाने बोलले. शिक्षेची घोषणा झाल्यानंतर राहुल गांधींना जामीन देण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 30 दिवसांची मुदत दिली असून, त्यामध्ये ते या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात अपील करू शकतात.

यावेळी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी सांगितले की, यावेळी स्वतः राहुल गांधीही न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अमित चावडा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी रघु शर्मा आणि इतर अनेक आमदार आणि पक्षाचे कार्यकर्ते सुनावणीदरम्यान सुरत न्यायालयात उपस्थित होते.

काय आहे राहुल गांधींचे वादग्रस्त विधान

2019 लोकसभा निवडणुकीची वेळ होती. राहुल गांधी काँग्रेससाठी रॅली करत होते. राहुल गांधी कर्नाटकातील कोलार येथे एका मोठ्या निवडणूक सभेला संबोधित करत होते. या रॅलीत राहुल गांधी यांनी मोदींच्या आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले. कर्नाटकच्या सभेत राहुल गांधी म्हणाले होते की मोदी आडनाव असलेले लोक चोर का आहेत? नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी हे आडनाव कॉमन का आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?