मोठी बातमी, राहुल द्रविडने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज!

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडने मंगळवारी भारताच्या वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. यामुळे द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएचा (National Cricket Academy) प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनूसार 2021 च्या आयसीसी टी२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड रवी शास्त्रीची जागा घेणार आहे.

भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा कार्यकाळ सध्या चालू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. तर भारतीय संघाचे ट्रेनर निक वेब हे टी-२० विश्वचषकानंतर कार्यमुक्त होणार आहेत. त्यामुळे विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षकवर्ग मिळणार हे स्पष्ट झालं आहे.


राहुल द्रविड सध्या बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. तसेच द्रविड यापूर्वीही भारताच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी भारताचा एक संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर होता त्यावेळी भारताचा दुसरा एक संघ राहुल द्रविडच्या हाताखाली श्रीलंका दौऱ्यावर होता.

द्रविडने भारताच्या अंडर-१९ आणि भारत-अ संघालाही क्रिकेटचे धडे दिले आहेत. भारताच्या युवा खेळाडूंना घडवणीच्या काम द्रविडने ईमाने ईतबारे केलं आहे. त्याच्या हाताखाली प्रशिक्षण घेऊन अनेक युवा खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये स्व:ताला सिद्ध केलं आहे.

क्रिकेट जगतात ‘द वॉल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविड ने भारतीय क्रिकेट संघासाठी 164 कसोटी 344 वनडे आणि 1 टी-२० सामना खेळला आहे. यात त्याने कसोटी 13 हजार 288 धावा, वनडेत 10 हजार 889 धावा केल्या आहेत.