BCCI चा मोठा निर्णय, राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
नवी दिल्ली – भारतीय संघाबाबत BCCI ने एक मोठा निर्णय घेतला असून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती केली आहे. याबाबत BCCI ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यारून ट्वीट करत करत ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल द्रविड हाच भारताचा मुख्य प्रशिक्षक बनेल अशी चर्चा होती. मात्र आता त्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं आहे. द्रविड आता लवकरच रवी शास्त्री यांची जागा घेणार आहे. आयसीसी टी२० विश्वचषकानंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर विराटसेनेची कमान ही राहुल द्रविडच्या हातात येणार आहे.
???? NEWS ????: Mr Rahul Dravid appointed as Head Coach – Team India (Senior Men)
More Details ????
— BCCI (@BCCI) November 3, 2021
द्रविडने यापूर्वी भारत ‘अ’ संघाचे आणि भारताच्या अंडर १९ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असल्याने, खेळाडूंना घडवण्याचा द्रविडचा अनुभव फार मोठा आहे. काही दिवसांपूर्वीच तो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा प्रशिक्षकही होता.
आयसीसी टी २० विश्वचषक संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. याच मालिकेत राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारणार आहे.
न्यूझीलंड आणि भारत यांच्यात १७ नोव्हेंबरपासून टी २० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट-रोहितसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम मिळणार आहे. तर केएल राहुलकडे टी २० संघाचे कर्णधारपद सोपवण्याची दाट शक्यता आहे.