राफेल नदाल बनला ‘बाबा’! पत्नी मारियाने दिला मुलाला जन्म!

WhatsApp Group

Rafael Nadal Maria Perello Son : टेनिस दिग्गज आणि 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा बादशाह राफेल नदालच्या घरातून मोठी बातमी आली आहे. तो पहिल्यांदाच बाबा बनला आहे. नदालची पत्नी मारिया पेरेलो हिने शनिवारी पहिल्या मुलाला जन्म दिला. नदाल आणि मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. गेल्या जूनमध्ये नदालने पत्रकार परिषदेत पत्नी मारिया गरोदर असल्याची पुष्टी केली होती.

नदालने अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केली नसेल, परंतु फुटबॉल क्लब रियल माद्रिदने त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आणली आहे. रिअल माद्रिदने नदालला टॅग करत एक ट्विट केले आहे. क्लबने लिहिले, ‘आमच्या क्लबच्या मानद सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन. या क्षणी आनंद वाटण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. शुभेच्छा.’

नदाल आणि मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी 9 ऑक्टोबर 2019 रोजी लग्न केले होते. या दोघांनी स्पेनच्या माजोर्का बेटावर अतिशय खाजगी समारंभात लग्न केले. आता हे जोडपे पालक म्हणून त्यांच्या नात्यातील एक नवीन प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज आहे.

नदालच्या संघाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, मात्र काही मीडिया वेबसाइट्सने दावा केला आहे की त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव नदालच्या नावावर ठेवण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी, नदालने लेव्हर कपमध्ये दिग्गज रॉजर फेडररसोबत हातमिळवणी केली होती. हा फेडररचा निरोपाचा सामना होता, त्यानंतर स्विस स्टारने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. फेडररच्या फेअरवेल मॅचमध्ये नदालही भावूक झाला आणि त्यानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.