“यंदाचा टी-20 वर्ल्ड कप कोणीच बघणार नाही!”; अनुभवी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान, आयसीसीच्या फॉरमॅटवर उठवले प्रश्न
मुंबई: क्रिकेट विश्वात सध्या आगामी ‘आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६’ बाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र, या उत्साहाच्या वातावरणात भारताचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने एक खळबळजनक वक्तव्य करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताच्या यशात अनेकदा मोलाचा वाटा उचलणाऱ्या या खेळाडूने थेट विश्वचषकाच्या भविष्यावर आणि त्याच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अश्विनच्या मते, स्पर्धेचा सध्याचा फॉरमॅट आणि कमकुवत संघांविरुद्धचे सामने क्रिकेटमधील रोमांच संपवत आहेत.
काय आहे अश्विनच्या नाराजीचे कारण?
आर. अश्विनने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या विषयावर सविस्तर भाष्य केले आहे. त्याच्या मते, जेव्हा भारत आणि अमेरिका किंवा भारत आणि नामीबिया यांसारख्या विसंगत ताकदीच्या संघांमध्ये सामने होतात, तेव्हा प्रेक्षकांचा रस कमी होतो. तो म्हणाला, “भारत विरुद्ध अमेरिका किंवा नामीबिया असे सामने तुम्हाला खऱ्या अर्थाने टी-२० विश्वचषकापासून दूर नेतात. या सामन्यांमध्ये निकाल आधीच स्पष्ट वाटत असल्याने प्रेक्षकांमधील ती ओढ आता उरलेली नाही.” अश्विनच्या या विधानाने सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
जुना काळ आणि बदललेली मानसिकता
अश्विनने आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सध्याच्या परिस्थितीची तुलना केली. “१९९६, १९९९ आणि २००३ मध्ये जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा विश्वचषक म्हणजे काहीतरी खास असायचे. आम्ही वर्ल्ड कप कार्ड्स गोळा करायचो आणि शेड्यूल प्रिंट करून ठेवायचो. प्रत्येक चार वर्षांनी ही स्पर्धा येत असल्याने त्याची वाट पाहण्यामध्ये एक वेगळीच मजा होती,” असे तो म्हणाला. जुन्या काळात पहिल्याच फेरीत भारताचे सामने इंग्लंड किंवा श्रीलंका यांसारख्या ताकदवान संघांशी व्हायचे, ज्यामुळे स्पर्धेत सुरुवातीपासूनच रंगत असायची. मात्र, आजच्या काळात सामन्यांची संख्या वाढल्याने आणि कमकुवत संघांचा समावेश झाल्याने ती ‘प्रतीक्षा’ संपल्याची खंत त्याने व्यक्त केली.
डिफेंडिंग चॅम्पियन भारतासमोर मोठे आव्हान
७ फेब्रुवारी २०२६ पासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळी एकूण २० संघ या महाकुंभात सहभागी होणार आहेत. भारतीय संघ ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ म्हणून मैदानात उतरणार असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान भारतासमोर असेल. अश्विनने उपस्थित केलेले प्रश्न आयसीसीच्या धोरणांवर किती परिणाम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
