Quetta Gladiators संघाने PSL मध्ये घेतला मोठा निर्णय, चेन्नईच्या ‘या’ खेळाडूला बनवले मुख्य प्रशिक्षक

पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सने आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या माजी खेळाडूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

WhatsApp Group

क्वेटा ग्लॅडिएटर्स ही पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. या संघाने 2016 आणि 2017 मध्ये पहिल्या दोन हंगामात अंतिम फेरी गाठली होती. यानंतर संघाने 2019 मध्ये पीएसएलचे विजेतेपदही पटकावले. मात्र गेल्या चार हंगामात सफाराज अहमदच्या नेतृत्वाखाली क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. आता पुढील हंगामापूर्वी ग्लॅडिएटर्स संघाने मोठा निर्णय घेतला असून चेन्नई सुपर किंग्जच्या माजी खेळाडूची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

हा अनुभवी खेळाडू संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनची पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामासाठी क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रेंचायझीने बुधवारी याची घोषणा केली. तो यष्टीरक्षक फलंदाज मोईन खानची जागा घेणार आहे, ज्याने 8 वर्षांपासून ही जबाबदारी सांभाळली आहे.  शेन वॉटसनची ऑस्ट्रेलियासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून शानदार कारकीर्द आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघासोबत 2007 आणि 2015 चा विश्वचषक जिंकला होता. 42 वर्षीय खेळाडूने 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो 2022 मध्ये आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याचा माजी ऑस्ट्रेलियाचा सहकारी रिकी पाँटिंगसह सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सामील झाला.

आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सामने खेळले आहेत

शेन वॉटसन 2018 ते 2020 पर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. या काळात त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आणि सामने जिंकले. त्याने चेन्नई संघासाठी 43 सामन्यात 1252 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. शेन वॉटसनने आयपीएल 2018 च्या फायनलमध्ये 117 धावांची इनिंग खेळली होती. आता सीएसकेच्या या माजी फलंदाजाला पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.