राहुलच्या 98 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने उडवला चेन्नईचा धुव्वा

WhatsApp Group

दुबई – इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्स आमनेसामने होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात पंजाबने चेन्नईवर 6 गडी राखून मोठा विजय साजरा केला.

या विजयासह पंजाब किंग्ज संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर कोलकाता संघ राजस्थानकडून वाईटरीत्या हरला आणि मुंबईने शेवटचा सामना गमावला तर पंजाबचा संघ प्लेऑफचमध्ये खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केएल राहुलची नाबाद 98 धावांची अर्धशतकी खेळी

पंजाब संघासाठी कर्णधार केएल राहुलने 233.33 च्या स्ट्राईक रेटने 42 नाबाद 98 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.

धोनीच्या चेन्नई संघाचा सलग तिसरा पराभव

आयपीएल 2021 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. चेन्नई संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. या विजयामुळे पंजाब किंग्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आले आहेत तर मुंबई इंडियन्सचा संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे.

मोठी धावसंख्या उभारण्यास चेन्नईला अपयश

पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्जला सहा विकेट्सवर फक्त 134 धावाच करू दिल्या. सलामीवीर फाफ डू प्लेसिसने 55 चेंडूत 76 धावा केल्या असूनही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाब किंग्जसाठी लेगस्पिनर रवी बिश्नोईने त्याच्या जादूने प्रभावित केले. रवीने 4 षटकांत 25 धावा देऊन चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची विकेट घेतली. तर अर्शदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन बळी घेतले.

सलामीवीर फाफ डू प्लेसिसची दमदार खेळी गेली वाया

चेन्नईच्या फलंदाजीची जबाबदारी एकट्यानेच स्वीकारत फाफ डू प्लेसिसने पंजाबच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना केला. त्याने 55 चेंडूत 76 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली मात्र चेन्नईच्या पराभवामुळे त्याची ही खेळी वाया गेली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.