पंजाब सरकारच्या आरोग्यमंत्र्यांना अटक, प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशनचा आरोप

WhatsApp Group

नवी दिल्ली – पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले डॉ. विजय सिंगला यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय सिंगला हे आरोग्य विभागातील प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशन आणि निविदा मागत होते. त्याची तक्रार मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यानी चौकशी केली. अधिकाऱ्यांची चौकशी झाली, त्यानंतर मंत्री सिंगला यांना बोलावण्यात आले. मंत्र्याने चूक मान्य केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पंजाब पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांना अटक केली आहे. सिंगला यांना आता मोहालीतील फेज ८ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. यानंतर सिंगला यांनीही आम आदमी पक्ष सोडण्याची तयारी केली आहे. पंजाब आपचे प्रवक्ते मलविंदर कांग म्हणाले की, कलंकित लोकांना आम आदमी पक्षात स्थान नाही. सध्या मंत्री असलेल्या सिंगला यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.