Cricketer Death: क्रिकेट विश्वावर शोककळा! युवराज सिंगचा पठ्ठा ऋषभचा दुर्दैवी अंत; वृंदावनमध्ये घडली भीषण घटना
Punjab cricketer Rishabh Sharma death Vrindavan: भारतीय क्रिकेट क्षेत्रातील एक उगवता तारा निखळला आहे. टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेणाऱ्या पंजाबच्या ऋषभ शर्मा याचा वृंदावन येथे एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. रविवार, १३ एप्रिल रोजी वृंदावनमधील चामुंडा घाटाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे लुधियानासह संपूर्ण क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोटरबोट अपघातात संपले स्वप्न
लुधियानाचा रहिवासी असलेला ऋषभ शर्मा एका सहलीसाठी वृंदावनला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, चामुंडा घाटावर मोटरबोटचा भीषण अपघात झाला आणि त्यात ऋषभला आपला जीव गमवावा लागला. त्याचे पार्थिव हाती लागल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऋषभ केवळ एक खेळाडूच नव्हता, तर तो एलएलबीचे शिक्षणही घेत होता. अभ्यासासोबतच चंदीगडमधील एका क्रिकेट अकादमीमध्ये तो तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कामही करत होता.
दिग्गज फलंदाज युवराज सिंगकडून घेतले होते धडे
ऋषभची क्रिकेटमधील प्रतिभा वादातीत होती. त्याने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि प्रसिद्ध प्रशिक्षक अमित उनियाल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऋषभने आपल्या मेहनतीच्या जोरावर क्रिकेट वर्तुळात स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. युवराज सिंगसारख्या दिग्गजाकडून ट्रेनिंग मिळाल्यामुळे, तो लवकरच देशासाठी खेळेल अशी खात्री त्याच्या वडिलांना आणि चाहत्यांना होती.
वडिलांचे स्वप्न अपूर्णच राहिले
ऋषभच्या वडिलांना आपला मुलगा क्रिकेटच्या दुनियेत मोठे नाव कमावेल आणि देशाची शान वाढवेल, असा ठाम विश्वास होता. मात्र, काळाने घात घातला आणि एका मोटरबोट अपघातात हे स्वप्न कायमचे विरून गेले. एकीकडे वकिलीचे शिक्षण आणि दुसरीकडे क्रिकेटचे मैदान अशा दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होणारा ऋषभ आता केवळ आठवणीत उरला आहे. त्याच्या जाण्याने चंदीगड आणि पंजाबमधील क्रिकेट अकादमींमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
