बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यामधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. चालत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
या प्रकरणामुळे नागरीकांकडून संताप व्यक्त केला जातोय. पुण्यातील वानवडीमध्ये ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे बस चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आलीय. बस चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही मुली पुढच्या सीटवर बसत होत्या.
आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. आरोपी या मुलींना धमकीसुद्धा देत होता. अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेटच्या जागी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.