Road Accident in Pune : पुण्यात डंपरनं 9 जणांना चिरडलं, 3 जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

WhatsApp Group

Road Accident in Pune : पुणे येथे एका डंपरनं फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन निष्पाप मुलांचाही समावेश आहे. पुण्यातील वाघोली शहरातील केसनांद फाटा परिसरात पहाटे १२.३० च्या सुमारास हा अपघात झाला. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. फूटपाथवर एकूण १२ जण झोपले होते, बाकीचे फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. यादरम्यान भरधाव डंपर थेट फूटपाथवर चढला आणि झोपलेल्या लोकांना चिरडत पुढे गेला. आरडाओरडा ऐकून लोक धावत आले आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतले आहेत.