डिग्री नाही पण टॅलेंटचा जोरावर मारली बाजी! 19 वर्षांच्या तरुणीला ‘BMW’ कडून थेट नोकरीची ऑफर; ‘या’ कारणामुळे जगभरात चर्चा
नवी दिल्ली: सध्याच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी मोठी पदवी (Degree) असणे अनिवार्य मानले जाते. मात्र, १९ वर्षांच्या गौरी एम या तरुणीने या मानसिकतेला छेद दिला आहे. कोणत्याही कॉलेज पदवीशिवाय गौरीला जगातील दिग्गज कार उत्पादक कंपनी ‘बीएमडब्ल्यू’ने (BMW) फुल-टाइम मार्केटिंग रोलसाठी निवडले आहे. ज्या पदासाठी साधारणतः ५ वर्षांचा अनुभव लागतो, तिथे गौरीने केवळ आपल्या डिजिटल कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवले असून तिची ही यशोगाथा सध्या लिंक्डइनवर तुफान व्हायरल होत आहे.
कंपन्यांनी स्वतःहून केला संपर्क
गौरीच्या या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिला या नोकरीसाठी कोणताही अर्ज किंवा ईमेल करावा लागला नाही. बीएमडब्ल्यू कंपनीने तिची डिजिटल प्रोफाईल पाहून स्वतःहून तिच्याशी संपर्क साधला. गौरीने सोशल मीडियावर स्वतःचा एक मजबूत ‘पर्सनल ब्रँड’ तयार केला आहे. लिंक्डइनवर तिचे ६५ हजार, तर इंस्टाग्रामवर ३५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे हे डिजिटल मार्केटिंग कौशल्य पाहून केवळ बीएमडब्ल्यूच नाही, तर इतर तीन कंपन्यांनीही तिला एकाच आठवड्यात नोकरीची ऑफर दिली होती.
सोशल मीडिया प्रोफाइलच बनले ‘पोर्टफोलिओ’
गौरीच्या यशामागे तिची सततची मेहनत आणि योग्य दिशेने केलेले काम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिने याआधी टाटा मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्यांसोबतही काम केले आहे. आजच्या युगात तुमचे लिंक्डइन किंवा इंस्टाग्राम अकाउंट केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते तुमच्या कामाचा आरसा (Portfolio) आहे, हे गौरीने सिद्ध करून दाखवले. तिने सातत्याने सोशल मीडियावर शेअर केलेले दर्जेदार कंटेंट आणि तिची विचारसरणी यामुळे मोठ्या कंपन्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.
डिग्री विरुद्ध कौशल्य: नव्या वादाला तोंड
गौरीच्या या यशामुळे व्यावसायिक जगात आता ‘डिग्री महत्त्वाची की कौशल्य’ या जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. अनेक तरुण प्रोफेशनल्स याला करिअरची नवी आणि योग्य दिशा मानत आहेत. मात्र, काहींच्या मते तांत्रिक क्षेत्रांमध्ये औपचारिक शिक्षणाची (Formal Education) आपली वेगळी ओळख आणि महत्त्व आहे. असे असले तरी, पारंपारिक वाटेवरून हटून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी गौरीची ही कहाणी एक मोठी प्रेरणा ठरली आहे.
