पुण्यात केटरर्स आणि लग्नातील पाहुण्यांमध्ये भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. गुलाब जामुनला घरी नेण्यावरून हे भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 23 एप्रिल रोजी शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात घडली. व्यवस्थापक दिपांशू गुप्ता यांनी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी लोखंडे आणि कांबळे कुटुंबीयांचा विवाहसोहळा होता. संजय लोखंडे यांनी हॉल बुक केला होता. दुपारी दीड वाजता विवाह सोहळा सुरू झाला. पाहुण्यांना जेवण देण्यात आले. यानंतर हळूहळू जेवण आटोपून अनेक नातेवाईक घरी परतले होते.
यादरम्यान एका नातेवाईकाने किती अन्न शिल्लक आहे हे पाहण्यास सुरुवात केली. त्यांनी उरलेल्या पाहुण्यांना सांगितले की, नातेवाईकांनी केटरर्सकडून उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जावे. मग काय, काही नातेवाईकांनी डब्यात गुलाब जामुन भरायला सुरुवात केली.
तेव्हा केटरर्स म्हणाले की, हे गुलाब जाम तुमच्यासाठी नाहीयत. हे दुसऱ्या लग्नासाठी तयार केले आहेत. आहेत. यावरून वाद सुरू झाला आणि हळूहळू हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. नातेवाइकांनी मिळून व्यवस्थापक दिपांशू गुप्ता यांना बेदम मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सुरू असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.