
मुंबई : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना आता रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडमध्ये रोहा-मुरुड भागात बल्क ड्रग पार्क प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते.
वेदांता प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेलाच कसा? राज्य सरकारकडून याबाबत उत्तर मिळालं नसल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे. 40 आमदारांसोबत राज्यातील 2 प्रकल्पही यांनी पळवले. जीत कर हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरुनही आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केला आहे.
रायगडमधील बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. केंद्र सरकारबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण या सरकारचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार राज्यातून निघून गेले आहेत. राज्यातील तरूण शांत आहेत. पण त्यांचा अंत नका पाहू नका असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.