Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रियंका गांधींनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा, उद्या रंगणार सामना

आशिया कप 2022 सुरू झाला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईत खेळला जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना रंगणार आहे. यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याशी संबंधित एक आठवण सांगितली.
कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा उल्लेख करताना प्रियांका म्हणाल्या, “माझी खूप खास आठवण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी मी अनेक वर्षांपूर्वी कराचीला गेले होते. भारताने जिंकलेला क्षण मी कधीही विसरू शकत नाही. सामना पाहण्यासाठी गेलेले सर्व नेते मग ते भाजपचे असो वा काँग्रेसचे, सगळेच इतके खुश झाले की त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली. 28 ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान आशिया कप सामना आहे. संपूर्ण देशाच्या वतीने, माझ्याकडून आणि संपूर्ण कुटुंबाकडून शुभेच्छा.
विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच कालावधीनंतर सामना होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुबईत खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सरावात चांगलाच घाम गाळला आहे. त्याचबरोबर या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीकडून चाहत्यांनाही मोठ्या आशा आहेत. या स्पर्धेपूर्वी कोहली विश्रांतीवर होता. मात्र आता ते पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.