Prithvi Shawने मोडला रणजी ट्रॉफीतील 32 वर्षांचा विक्रम, ठोकले त्रिशतक

WhatsApp Group

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉचा धमाका सुरूच आहे. त्याची बॅट आग ओकत आहे. मुंबईच्या स्टार फलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध शानदार खेळी केली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक झळकावले. त्याने अवघ्या 326 चेंडूत ही धावसंख्या गाठली. यानंतर त्याने वेग पकडला आणि धडाकेबाज खेळी खेळली. अखेर 379 धावा करून तो बाद झाला आणि यादरम्यान त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. आपल्या खेळीत त्याने 49 चौकार आणि 4 षटकार मारले.

पृथ्वी शॉने 379 धावांच्या खेळीत 4 षटकार आणि 49 चौकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 98.96 होता. या सामन्याच्या पहिल्या दिवशी शॉ 240 धावांवर नाबाद परतला, जर पृथ्वी शॉ थोडा जास्त वेळ क्रीझवर राहिला असता तर तो 400 धावांचा विक्रम करू शकला असता.

पृथ्वी शॉने माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांचा 32 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. मांजरेकर हे रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्यांनी 1990-91 मध्ये हैदराबादविरुद्ध 377 धावा केल्या होत्या, तर पृथ्वीने 383 चेंडूत 379 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे त्याने मांजरेकर यांचा 32 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.

पृथ्वी शॉने केले ‘हे’ मोठे विक्रम

  • पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.
  • पृथ्वी शॉचे हे रणजी ट्रॉफीतील पहिले त्रिशतक आहे. त्याची यापूर्वीची सर्वोत्तम धावसंख्या 202 होती.
  • पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफी (कसोटी फॉरमॅट) मध्ये तिहेरी शतक, विजय हजारे ट्रॉफी (एकदिवसीय फॉरमॅट) मध्ये द्विशतक आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (T20 फॉरमॅट) मध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला.
  • त्रिशतक झळकावणारा पृथ्वी शॉ मुंबईचा 8वा फलंदाज आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये उच्च धावसंख्या असलेले फलंदाज

  • बीबी निंबाळकर – 443* धावा, महाराष्ट्र – काठियावाड विरुद्ध (1948)
  • पृथ्वी शॉ – 379 धावा, मुंबई – आसाम विरुद्ध (2023)
  • संजय मांजरेकर – 377 धावा, बॉम्बे – विरुद्ध हैदराबाद (1991)
  • एमव्ही श्रीधर – 366 धावा, हैदराबाद – आंध्र विरुद्ध (1994)
  • विजय मर्चंट – 359* धावा, बॉम्बे – महाराष्ट्राविरुद्ध (1943)
  • सुमित गोहेल – 359* धावा, गुजरात – ओडिशा विरुद्ध (2016)