राष्ट्रपतींच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान

WhatsApp Group

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 23 जानेवारी 2023 रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 11 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की मुले ही आपल्या देशाची अनमोल संपत्ती आहे. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न आपला समाज आणि देश यांच्या भविष्याला आकार देत असतो. या बालकांना सुरक्षित आणि आनंदी बालपण तसेच उज्वल भविष्य देण्यासाठी आपण हर प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. बालकांना पुरस्कार देऊन आपण त्यांना प्रोत्साहित करतो आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करतो.

राष्ट्रपती म्हणाल्या की या पारितोषिक विजेत्या बालकांमधील काही जणांनी इतक्या लहान वयात अशा प्रकारच्या दुर्दम्य साहस आणि शौर्याचे दर्शन घडविले आहे की ते पाहून आश्चर्यचकित होण्याबरोबरच  पण त्यांच्या  कामगिरीची माहिती समजल्यावर आपण भारावून गेल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. त्यांचे उदाहरण सर्व मुलांसाठी आणि युवकांसाठी प्रेरक आहे असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की आपण सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. आपण अत्यंत खडतर संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळविले आहे. आणि म्हणूनच, नव्या पिढीतील सर्वांनी या स्वातंत्र्याचे मूल्य ओळखावे आणि त्याचे रक्षण करावे अशी त्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे. मुलांनी नेहमी देशहिताचा विचार करावा आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा देशासाठी काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.

आजची लहान मुले पर्यावरणाप्रती अधिक सजग आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मुलांनी काहीही काम करताना पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही हे लक्षात घ्यावे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.

कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, विद्वत्ता, समाज सेवा आणि क्रीडा या सहा श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, समाज सेवा आणि क्रीडा या श्रेणींमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले.