ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी साबरमती आश्रमात चालवला चरखा! ब्रिटिश PM यांना खास भेट

WhatsApp Group

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आज दोन दिवसीय अहमदाबाद दौऱ्यावर आगमन झाले असून तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. दुसरीकडे ते शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. दोन्ही देशांना संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात आपले संबंध आणखी पुढे नेण्याची इच्छा आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. याआधी बोरिस जॉन्सनही युक्रेनची राजधानी कीवच्या रस्त्यांवर फिरताना दिसले होते.

गुजरातच्या दौऱ्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान विज्ञान, आरोग्य, तंत्रज्ञान या क्षेत्रात गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. यानंतर शुक्रवारी म्हणजेच उद्या बोरिस जॉन्सन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत संरक्षण आणि व्यापार करारांवर चर्चा होणार आहे.

2035 पर्यंत आपला व्यवसाय $36.5 अब्ज पर्यंत वाढवण्याचे ब्रिटनचे लक्ष्य आहे. एक काळ असा होता की ब्रिटन हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता पण आता ब्रिटन 17व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या भारताचा बहुतांश व्यापार अमेरिका, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत होतो.

पीएम मोदी आणि पीएम बोरिस जॉन्सन यांच्यात अनेक विशेष मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यादरम्यान, इंडो-पॅसिफिक प्रदेशावरही चर्चा होणार आहे जिथे चीन आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, ही ब्रिटनसाठी चिंतेची बाब आहे.