
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावर एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने बुधवारी केला. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
शिवसेनेच्या आमदार आणि ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची ही पहिलीच निवडणूकीची परीक्षा असेल. जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
ऋतुजा लटके यांनी बुधवारी सांगितले की, आपण मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली नाही. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर पोटनिवडणूक लढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब यांनी दावा केला की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रभाग ‘क’ मधील प्रशासकीय अधिकारी ऋतुजा लट्टे यांचा राजीनामा स्वीकारला जात नाहीय. ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा दबाव आहे असं अनिल परब म्हणाले आहेत.
याआधी पक्षाच्या एका नेत्याने पुढील दोन दिवसांत राजीनामा स्वीकारला नाही तर 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार नसल्याचे सांगितले होते. याप्रकरणी ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे परब यांनी सांगितले. ऋतुजा यांची ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाशी असलेली निष्ठा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.