
Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी (President Election 2022 Voting) होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून नवीन राष्ट्रपतींना 25 जुलैपर्यंत शपथ घ्यायची आहे. यापूर्वी 2017 मध्ये अध्यक्षपदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक झाली होती. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य मिळून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक मंडळ (Electoral Board) तयार करतात आणि त्यानंतर ही निवडणूक संपन्न होते.\
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात.
देशातील जनता या निवडणुकीमध्ये थेट मतदान करत नाही. त्याऐवजी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच खासदार आणि आमदार या निवडणुकीमध्ये मतदान करतात. या निवडणुकांमध्ये राज्यसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार आणि विधानसभांमधील आमदार यांना मतदानाचा अधिकार आहे.
कशी असते निवडणुक प्रक्रिया?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करताना आमदार आणि खासदार बॅलेट पेपरवर त्यांची निवड करतात आणि त्यात ते त्यांची पहिली पसंती, दुसरी पसंती आणि तिसरी पसंती नमूद करतात. आधी प्रथम पसंतीची मते मोजली जातात. जर पहिल्या पसंतीच्या उमेदवाराने विजयासाठी आवश्यक वेटेज मिळवले तर तो विजयी म्हणून घोषित केला जातो आणि जर ते मिळाले नाही तर दुसऱ्या आणि नंतर तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.