गोव्याचा मुख्यमंत्री ठरला! भाजप आमदारांच्या बैठकीत ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

WhatsApp Group

पणजी – गोव्याच्या (Goa) नव्या मुख्यमंत्री निवडीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये प्रमोद सावंत यांच्याकडे यापुढेही राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच प्रमोद सावंत हे गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. गोव्यातील भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हे सर्वांनी मान्य केले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आल्याच्या 11 दिवसांनंतर ही बैठक भाजपने घेतली. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आज दुपारी येथे दाखल झाले होते.

भाजप राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये 20 जागा जिंकली आहे. जे बहुमतासाठी आवश्यक जागांपेक्षा केवळ एक सीटने कमी आहे. भाजपने एमजीपीचे दोन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचे समर्थन मिळवले आहे. यामुळे नव्या विधानसभेमध्ये संख्याबळाच्या बाबतीत आरामदायी स्थिती आहे. सावंत यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची राजभवनामध्ये भेट घेणार आहे.